उजेडाच्या इच्छेवर तुमची सही...
---- यशवंत मनोहर (ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक)
बाबासाहेब...!
---- यशवंत मनोहर (ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक)
बाबासाहेब!
तुम्हाला बदलायची होती दिशांची नेणीव
आणि त्यांच्या जागा
तुम्हाला बदलायची होती क्षितिजे
त्यांच्या मनातील प्रयोजने.
तुम्हाला माहीत होता
दिशांचा होणारा कोंडमारा
माहीत होते क्षितिजातून उगवतो
सूर्यही आणि अंधारही
क्षितिजातून उगवतात माणसांचे अस्त
आणि होतात उदयही
क्षितिजांची झाडे फुलतात तारकांनी
कधी ज्वालामुखी गिळून टाकतात
क्षितिजांना
आणि जाहीर होते आणीबाणी.
तुम्हाला हवी होती क्षितिजे
विषमता उगवायला ठाम नकार देणारी
आणि गिळू शकणार नाही ज्वालामुखी
अशा नव्या क्षितिजांचे निर्माण
करायचे होते तुम्हाला.
तुम्हाला द्यायचे होते नीतीला समाजवादी
चारित्र्य आणि
सत्याला सौंदर्याची नीती.
तुम्हाला लिहायचे होते
अत्तदीप माणसाच्या विजयाचे संविधान.

माणुसकीला लागले होते ग्रहण तृष्णेचे
आणि माणूस करायचा होता तुम्हाला
ग्रहणमुक्त
माणसाच्या संपूर्ण ऊर्जेच्या तळाशी
तुम्ही केली प्रदीर्घ चर्चा...
चांदण्यावरील शेवाळ करावे दूर
सूर्यावर होणारे मेघांचे आक्रमण
लावावे परतवून
तसा माणूस करायचा होता
प्रदूषणमुक्त तुम्हाला
त्याच्यात उभारायची होती
स्वयंपूर्णता
सर्व पडदे बाजूला सारून
माणूस करायचा होता
तुम्हाला निरभ्र.
करायचा होता पारदर्शक.
सिद्धान्तांच्या विश्वयुद्धात उडी घेतली
तेव्हाही वणवा बांधलेला होताच
तुमच्या काळजाला
बाबासाहेब...!
तुम्हाला लावायचा होता शोध
प्रश्नांच्या आणि युद्धांच्या उगमाचा.
तुम्हाला मांडायचे होते
लोभाचे अनर्थशास्त्र.
तुम्हाला चितारायचा होता गोंधळ
अनीतिशास्त्राने घातलेला
नीतिशास्त्राच्या नावाखाली.
तुम्हाला जायचे होते
शोषणाच्या अदृश्य मुळापर्यंत
ओंजळीत घेऊन वाचायची होती तुम्हाला
माणसाच्या दुष्ट रचनेची संहिता
लावायचा होता
तिच्यामागील फसव्या कारणांचा छडा
आणि प्रस्थापित करायची होती
माणसाच्या मनाची पर्यायी रचना
माणसाच्या सौंदर्याची संहिता
पारदर्शक -
उतरंडी निर्माण करणारी
माणसांच्या मनांची निर्मिती
अंतिमही नव्हे आणि
नव्हे पर्यायविहीनही.
दुनियेच्या गोंधळलेल्या मेंदूला
हे महासत्य समजावून सांगण्यासाठी
तुम्ही जिवाचे रान केले.
स्थापना, पुनःस्थापना करायची होती
त्याची दुनियेच्या विचारनिर्मिती केंद्रात.
तुम्ही सुरू केली क्रांतीची प्रयोगशाळा,
मानवी मनांच्या जटिल अंतराळात.
अंतराळातील बंद गुहांचे
प्रकाशन करण्यासाठी,
त्यांच्या अबोल अस्तित्वाची
फुले खुडण्यासाठी
आणि त्यांच्या मुक्या अस्तित्वाला
अभिव्यक्ती देण्यासाठी
सुनीता विल्यमला कोणत्यातरी
भूभागावरून उड्डाण घ्यायचे असते
तसे संपूर्ण मानवी जीवनाचे अंतराळ
उराशी कवटाळण्यासाठी
तुम्हीही भारताच्या भूमीवरूनच
उड्डाण घेतले.
तुम्ही कवटाळलेल्या अंतराळाने
तुम्हालाही कवटाळले उराशी
बाबासाहेब...!
भारताचा विचार
विश्वाच्या अनुबंधात
आणि विश्वाची तपासणी
भारताच्या संदर्भबंधात,
भारतातील माणसांच्या गाठींची उकल
वैश्विक जीवनाच्या विराट परिप्रेक्ष्यात
आणि वैश्विक गणिताची सोडवणूक
भारतीय मनांच्या परिप्रेक्ष्यात
करायची होती तुम्हाला.
तुमच्या नजरेत
पसरवून ठेवला होता तुम्ही
मानवी मनांच्या कोलाहलाचा नकाशा
आणि माणसाला स्वस्थ होऊ न देणाऱ्या
प्रश्नांचे गाठोडे ठोक्यात घेऊन
तुम्ही उगवत आणि प्रखरत होता
निरंतर.
तुम्ही मांडली वैश्विक कल्लोळाची समीक्षा
प्रश्नांच्या धबधब्याखाली बसून.
तुम्ही जीवनाची सोनोग्राफी केली.
तुमच्या निष्कर्षांना स्थलातीताचे
पंख फुटले.
स्थानियतेचे आणि वैश्वियतेचे
एक नवे फ्यूजन
तुम्ही दुनियेच्या पदरात टाकले.
बाबासाहेब...!
आज वाढदिवस तुमचा
‘स्टेटस् अँड मायनॉरिटीज’मधील
तुमचा विश्वपुनर्रचनेचा सिद्धान्त
पुन्हा डोक्यात घेतला.
तुमच्या तहानभूकेचे मूल्यार्थ
उलगडत होते नजरेपुढे
आणि तुमच्या कक्षातीत मेंदूने
पुन्हा एकदा माझी मती गुंग झाली
मला हे दिसले की,
उजेडाच्या प्रत्येक इच्छेवर
तुमची सही आहे.
वाटले तुमचा प्रत्येक शब्द म्हणजे
तुमचे प्रतिरूप आहे
तुमचा प्रत्येक शब्द गर्भार आहे.
आणि या शब्दांमधून
क्रांतिकारी जीवनपिसारा
जन्माला येऊ शकतो.
बाबासाहेब...!
तुमचा सिद्धान्त
विज्ञानस्वभावी माणसाचा
सिद्धान्त होता.
हा माणूसच तुमच्यासाठी
एक जिवंत प्रयोगशाळा
झाला होता.
ही प्रयोगशाळा त्याच्या
विज्ञाननिर्मितीची होती.
माणूसच स्वतः विज्ञान होता
आणि सर्वहितलक्ष्यी विज्ञानाची
निर्मिती तो करीत होता.
त्यांच्या साकल्याच्या निर्मितीचा
तोच एक महान प्रमाण होता.
शोषणविहीनता आणि
हिटलरविहीनता
हे या प्रयोगशाळेचे उद्दिष्ट होते
अंधाराचे संचित खांद्यावर घेऊन
अंधारात शिरणाऱ्या माणसांचे
उत्पादन विघातक आहे
हे तुम्ही सांगता
अंधाराचे रस्ते खांद्यावर घेऊन
अंधाराच्या जंगलात फिरू नका
हेही तुम्ही सांगता
तुम्हाला ठेवायचे होते
प्रत्येकच माणसाचे नाव
पुनर्रचना
आणि निरंतर पुनर्रचना, आणि
क्रांतिकारी पुनर्रचना
हे तुमचेच नाव होते.
No comments:
Post a Comment